whatsapp-image-2016-12-17-at-5-08-30-pm

कोळेगाव फार दूर नाही शहरापासून; कल्याण डोंबिवली पासून फार तर २० मिनिटांच्या अंतरावर आहे. जुलै अखेरपासून कोळेगाव मध्ये पहिली युवा गटाची मीटिंग झाली. आता १० ते १२ सेशन्स नंतर जो फरक पडलेला दिसतोय त्याने आशावाद वाढतोय; काम करायला हुरूप येतोय.

पहिल्या दिवशी एकमेकांशेजारी बसायलाही तयार नसणारी मुले-मुली, [अगदी ५ फुटांचे अंतरावरही] एकमेकांशी बोलणे तर सोडाच; बघणेही टाळत होती. तीच मुले आज एकमेकांशी चर्चा करू लागली आहेत; एकमेकांना मदत करू लागली आहेत,एकत्र खेळू लागली आहेत, एकत्र कामही करू लागली आहेत. आधी यांना वाटत होते कि आपण काहीही करू शकत नाही; बदल होत नाही. पण हीच मुले आज  जेव्हा आम्ही विविध मुद्दे समोर ठेवून गावात फिरतो, तेव्हा गावात भविष्यात कोणकोणत्या सुविधा कोण कोणत्या भागात  हव्यात; याबद्दल पण चर्चा करतात. गावातल्या ठराविक जागा ठराविक गटांसाठीच आहेत; त्या सर्वांसाठी खुल्या असल्या तरी त्याचा फायदा ठराविक घटकांनाच होतो. गावात सार्वजनिक वाचनालयाची तसेच सायबर कॅफे ची गरज आहे. अशा एखाद्या जागेची गरज आहे; जिथे सर्वधर्मीय, सर्वजातीय, प्रांतीय, स्त्री-पुरुष, मुले-मुली एकत्र येतील असे मत या युवा गटाने मांडले. संविधानातील मूल्यांवर चर्चा करताना त्यांनी असे शोधून काढले कि समता, व्यक्तीची प्रतिष्ठा, हि मूल्ये आहेत; पण प्रत्यक्षात वेगळे चित्र दिसते. विशेषतः अल्पसंख्यांकांना, मुलींना, बाहेरील प्रांतातून इथे आलेल्याना खूप दबून राहावे लागते. इथल्या स्थानिक प्रभावशाली गटाला गाववाले असे संबोधतात. एकदा गाववाले आणि बाहेरचे असे दोन गट आहेत, त्याबद्दल चर्चा चालू होती. गाववाले कोण आणि बाहेरचे कोण असा विषय सुरु होता. तेव्हा एका अल्पसंख्य मुलाने सांगितले कि आम्ही बाहेरचे आहोत, गाववाले नाही; तेव्हा तिथला गाववाला मुलगा पटकन म्हणाला कि असे कसे? तीस वर्षांपासून तुम्ही इथे राहता म्हणजे तू पण गाववालाच आहेस कि. मग चर्चा झाली कि गावातला घटकच मी स्वतःला समजत नसेन, माझे गावात काही स्थान नाही असे मनात असेल तर गावात काही चांगले बदल करण्यासाठी मी कसे काय काम करणार? मला गावाविषयी आस्था कशी वाटणार? म्हणजे संविधानाने तर भारतात कुठेही राहण्याचा अधिकार दिला आहे; पण प्रत्यक्षात आपण जर दुसऱ्या प्रांतात जाऊन राहिलो तर तिथे आपले, आणि बाहेरचे असा भेदभाव करतो. समानता हे मूल्य आहे; पण जवळच्या आदिवासी पाड्यावरील लोकांना सार्वजनिक शौचालया सारखी मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत, तिथली बहुसंख्य मुले शाळेत जात नाहीत; मग जो अधिकार संविधानाने दिलाय तो मिळत नाही, समाज ते त्यांना देत नाही, किंबहुना ते त्यांना मिळणार नाहीत हे सर्वांनी गृहीत धरले आहे. शाळेत जाण्यासाठी, अभ्यासासाठी, अगदी अनुभूती च्या क्लास ला येण्यासाठी सुद्धा मुलींना सकाळपासून खूप धावपळ करावी लागते, भराभर  कामे आटपावी लागतात, तेव्हा कुठे क्लास च्या वेळेत जेवण करून पोचता येते. आपल्या बहिणी आळशी आहेत, त्यांना शिकायला आवडत नाही म्हणणाऱ्या मुलांना त्यांचे दोघांचेही दिनक्रम विचारले असता विरोधाभास त्यांनाच शोधून काढता आला. त्यामुळे आता मात्र हीच मुले आपल्या बहिणींनी क्लासला यावे यासाठी घरकामात सहभाग घेत आहेत,पालकांनी बहिणींना क्लास ला पाठवावे म्हणून त्यांच्याशी संवाद साधून, त्यांचे मन वळवून बहिणींनी क्लास ला येण्यासाठी त्यांना सक्रिय पाठिंबा देऊ लागली आहेत.

एकंदर १० ते १२ सेशन्स नंतर एकत्र येणे, स्वतःचे विचार मांडणे, विश्लेषण करणे, वाटाघाटी करणे, स्वतःवर विश्वास ठेवणे, गटात काम करणे, सक्रिय पाठिंबा देऊन जबाबदारी घेणे ह्या गोष्टी घडत आहे म्हणून कामाला हुरूप येतोय,आशावाद वाढतोय.

-Contributed By Tilottama