IMG_20170309_132529519_HDR

१० जानेवारी २०१७ रोजी सावित्रीबाईंच्या १२०व्या पुण्यतिथीनिमित्त “अनुभूती”, ने “शरीर संवाद अभियान” अंतर्गत कल्याण डोंबिवली भागातील पुरुष सरकारी आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित केले होते. प्रशिक्षणाची संकल्पना, आणि आखणी दीपा पवार ने केली होती. सत्राची सुरुवात अम्रिता ने सर्वांना आपले नाव, छंद सांगून करून द्यायला सांगितले. प्रत्येकाने आपल्या एकंदर करिअर प्रवासाबद्दल पण सांगितले. काही जण गायक, कवी, पोलिटिकल रस असणारे, फिरायला आवडणारे असे होते. सगळ्यांची एकाच तक्रार होती,कि कुटुंबाला वेळ देता येत नाही, छंदाला हि वेळ देता येत नाही त्यामुळे बरेचसे प्रश्न उद्भवतात. आणि सगळ्यांना आपल्या कामाबद्दल कळकळ आहे,हा सामान धागा होता.

हक्क आणि अधिकार म्हणजे काय हे प्रत्येकाने त्याला जे वाटते ते सांगायचे होते. कुणी सांगितले कि कर्तव्य, सामाजिक प्रश्नांवर काम करणे, दुसऱ्यांच्या अधिकारांबाबत संवेदनशील असणे ई.

प्रत्येकाने एक एक वैयक्तिक मुद्दा मांडला आणि हा वैयक्तिक नसून समाजाशी जोडलेला आहे हे लक्षात आले. “मग पर्सनल इस पोलिटिकल हे सगळ्यांचे एकमत झाले.” प्रत्येकाला जसे मूलभूत अधिकार आहेत, तशीच मूलभूत कर्तव्येही आहेत अभियक्ती करताना पाठबळ आणि अधिकार यांचा महत्वाचा संबंध असतो. आपले प्रोफेशन हे कोणत्या अधिकाराशी जोडलेले आहे, ह्याचा विचार सुरु झाला, पण पटकन लक्षात येईना. मग दीपा पवार ने सांगितले कि आरोग्य कर्मचारी म्हणून आरोग्याच्या अधिकाराचे आपण भागीदार आहोत. मग भागीदारी निभावताना सत्ता पण येते. अधिकार बजावताना सत्ता येते,सत्ता संघर्ष येतो. आरक्षणाचा मुद्दा, WHO च्या गाईडलाईन्स वाचणे इ मुद्य्यांवर चर्चा झाली.

“कुटुंब कल्याण”, म्हणजे काय हे जेव्हा विचारले, तेव्हा, “छोटे कुटुंब, सुखी कुटुंब, मर्यादित कुटुंब, आर्थिक,शारीरिक मानसिक उन्नती,स्थैर्य ,वाढत्या लोकसंख्येला आला घालणे, कुटुंब नियोजन, १ ते २ अपत्यांवर नियोजन केल्यास विकास होईल, आरोग्याची मग ते शारीरिक, आर्थिक, मानसिक आणि सामाजिक असो काळजी घेणे व ते चांगले राखणे, असे मुद्दे समोर आले.

मग चर्चा झाली कि अशा अधिकारांची अंमलबजावणी करताना काही वर्ग, लोक, दुर्लक्षित केले जातात.

हंगामी कामासाठी स्थलांतरीत महिलांच्या[ऊस तोडणी करणाऱ्या, वीटभट्टी वर काम करणाऱ्या मेंढीपाळ, इ]सुरक्षेसाठी काय करावे? तर उत्तर मिळाले कि त्यांच्या बरोबर शरीर साक्षरता कार्यशाळा घेतल्या पाहिजेत. लैंगिक अत्याचार होतोच, पण तो थांबवण्याऐवजी त्यांचे गर्भाशय काढून टाकण्यासारखा अमानवी पर्याय निवडला जातो. आपण अत्याचार थांबवण्याविषयी उपाययोजना करण्याबद्दल न बोलता, फक्त त्याना गर्भधारणा राहू नये म्हणून उपाय शोधतो आहोत. हे जेव्हा लक्षात आणून दिले तेव्हा शांतता पसरली. मग हे सगळे बदलले पाहिजे आणि ते बदलण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे असा मुद्दा आला. पण हे बदलणे एकट्याचे काम नाही, तर एकत्र येणे, संघटनेची बांधणी करणे गरजेचे आहे, संघटनात ताकद असते. आणि हे सगळे आपण स्त्री च्या “शरीर गरीमा” अधिकारासाठी करत आहोत, ती माणूस म्हणून आपणा सर्वांची जबाबदारी आहे, असे मुद्दे पुढे आले.

मग कुटुंब नियोजनासाठी येणाऱ्या एका दाम्पत्याला समुपदेशन करण्यासाठी एक रोल प्ले दिला होता. त्यावरून लक्षात आले कि आपण किती पुरुषकेंद्रीत विचार करतो,आणि जिच्याकडे गर्भाशय आहे तिचा विचार घेत नाही, सिस्टिम ने सुद्धा बाई वर च वापरल्या जाणाऱ्या पद्धतींवर लक्ष केंद्रित केले आहे. हे लक्षात आले. मग जिचे शरीर, तिला तो अधिकार असला पाहिजे, हा विचारच आपल्या मनात येत नाही, कारण, आपल्यावर तसेच बिंबवले गेले आहे.
काही जणांनी आपले अनुभव सांगितले,जे सगळ्यांना सुन्न करून गेले. डहाणू जवळील आदिवासी पाड्यावर जर एक क्वार्टर दारु दिली तरी बायका नसबंदी करायला आनंदाने तयार होतात. स्रीयांकडे कुटूंब पण लक्ष देत नाहीत, त्यांची काळजी घेत नाहीत. कारण ते वाईट असतात असे नाही, तर त्यांना स्त्रीला होणाऱ्या त्रासाची विशेष कल्पना नसते. म्हणून संवाद साधण्याची गरज आहे,जबाबदारी वाटून घेण्याची गरज आहे. मग दीपा ने उलटी चे उदाहरण दिले. जर आपण प्रवास करत असू,आणि आपल्याला उलटी झाली तर ती साफ करण्याची कोणाची? आपली कि बाजूला असणाऱ्याची? सगळे म्हणाले कि आपली स्वतःची. मग वीर्य बाहेर येते, तेव्हा जबाबदारी कोणाची? त्याची जबाबदारी कि त्याच्या पार्टनर ची? सगळ्यांनी मान्य केले कि ही ज्याचे वीर्य त्यांची जबाबदारी. स्त्रियांना लैंगिक इच्छा असतात, पण त्यांना ते व्यक्त करायला जराही स्पेस नाही हे ही मुद्दे पुढे आले. मग आपण आजपासून स्वतःच्या कामाच्या पद्धती मध्ये थोडा बदल करू शकतो का असा विचार आपण बरोबर नेत आहोत, असे सगळ्यांनी सांगितले. आणि काही मागण्या पण मांडल्या, कामातील आव्हाने सांगितली. 
सत्र उत्स्फूर्त झाले. पुरुष आरोग्य कर्मचारी खरोखरच संवेदनशील आहेत, आपल्या कामाविषयी त्यांना कळकळ आहे, ते स्वतःचे अनुभव शेअर करत होते, सहभाग घेत होते. दीपा कडून खूप शिकायला मिळते. MPW सुपरवाईजर तर इतके सकारात्मक प्रतिसाद देऊन सपोर्ट करत होते, की, या सत्रामुळे शरीर संवाद अभियानाला पुढे अजून व्यापकता मिळण्याविषयी उमेद वाढली,आणि पुढचे पाऊल उचलण्यासाठी हिम्मत मिळाली. एक भन्नाट अनुभव दिल्यामुळे दीपा पवार आणि सर्व MPW चे, सुभद्राताई, वर्षा तुम्हा सर्वांचे आभार!

– तिलोत्तमा थिटे